Budget 2025 Key Decisions : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (1 फेब्रुवारी 2025) देशाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या 14 व्या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठी करमाफी, उद्योगांसाठी प्रोत्साहन आणि आरोग्य क्षेत्रासाठी दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले. ‘या’ पाच निर्णयांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडणार आहे.
12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर करमाफी
या बजेटमध्ये करदात्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते, परंतु आता ही मर्यादा 12 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, पगारदार कर्मचाऱ्यांसाठी स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आता 12.75 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या नागरिकांना कर भरण्याची गरज राहणार नाही.
अपडेटेड इनकम टॅक्स रिटर्न भरण्यास 4 वर्षांची मुदत
टॅक्सपेअर्ससाठी आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे अपडेटेड इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची सध्याची 2 वर्षांची मर्यादा आता 4 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे करदात्यांना त्यांच्या जुन्या आर्थिक व्यवहारांचे पुनरावलोकन करून आवश्यक ते बदल करण्याची संधी मिळेल.
36 जीवनावश्यक औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द
कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवरील उपचारांचा खर्च कमी करण्यासाठी सरकारने 36 जीवनावश्यक औषधांवरील कस्टम ड्युटी हटवली आहे. यामुळे रुग्णांसाठी या औषधांच्या किंमती कमी होतील आणि त्यांना आर्थिक दिलासा मिळेल.
दोन घरांवर करसवलत
आतापर्यंत कर सवलत फक्त एका घरासाठी मिळत होती. मात्र, या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी मोठा बदल केला असून, आता दोन घरांसाठीही करसवलत लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दोन घरांत राहणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
वरिष्ठ नागरिकांसाठी व्याजावर करमाफी दुप्पट
यावर्षीच्या बजेटमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावर कर सवलतीची मर्यादा 50,000 रुपयांवरून थेट 1 लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे पेन्शनधारक आणि व्याजावर अवलंबून असलेल्या वृद्ध नागरिकांना मोठा आर्थिक फायदा मिळेल.
बजेट 2025 (Budget 2025) मधील या निर्णयांमुळे सर्वसामान्य नागरिक, करदाते, व्यावसायिक आणि जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारच्या या आर्थिक धोरणांमुळे पुढील वर्षात अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता आहे.
🔴 हेही वाचा 👉 ताजी अपडेट! लाडकी बहीण योजनेचे अजून २२,२१९ अर्ज अपात्र! जाणून घ्या कारणे.