Ladki Bahin Yojana High Court Hearing February 7: महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या कायदेशीर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ही योजना महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी राबवण्यात येत असली तरी, या योजनेवर काही याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे हायकोर्टाने या प्रकरणावर पुढील सुनावणी 7 फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.
सरकारचे न्यायालयात स्पष्टीकरण
राज्य सरकारने या योजनेंतर्गत महिलांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याबाबत हायकोर्टात स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही संविधानिक तरतुदींच्या आधारावर तयार करण्यात आली असून, सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने गरजू महिलांना सक्षम करण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले.
राज्य वित्त विभागाच्या सचिवांनी हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, “ही योजना वंचित महिलांना आर्थिक, सामाजिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे हा निधी ‘मोफत वाटप’ असल्याचे म्हणणे चुकीचे ठरेल.”
7 फेब्रुवारीला महत्त्वाची सुनावणी
हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना त्यांच्या आक्षेपांबाबत भूमिका स्पष्ट करण्याची संधी दिली आहे. या प्रकरणावर येत्या 7 फेब्रुवारीला न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी या योजनेच्या वैधतेबाबत जनहित याचिका दाखल केली आहे. त्यांचे वकील अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी या सुनावणीदरम्यान सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
🔴 हेही वाचा 👉 फेब्रुवारीतच महिलांना मिळणार १५०० ऐवजी २१०० रुपये? जाणून घ्या सविस्तर.
लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठे आरोप
मागील वर्षी जुलै महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना 1,500 रुपये मासिक मदत दिली जाते. मात्र, काही प्रकरणांमध्ये अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
अन्न व नागरी पुरवठामंत्री सुनिल तटकरे यांनी सांगितले की, “काही लाभार्थी 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणारे आहेत. काहींकडे चारचाकी वाहन आहे तर काही सरकारी नोकरीत असलेले कुटुंबीय आणि लग्नानंतर इतर राज्यात स्थलांतर झालेल्यांनाही लाभ मिळाला आहे. त्यामुळे या तक्रारींची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
🔴 हेही वाचा 👉 वयोश्री योजना थांबली? ‘लाडक्या बहिणींसाठी’ राज्य सरकार काढतय दरमहा ‘इतक्या’ कोटींच कर्ज.
सरकार कोणता निर्णय घेणार?
माझी लाडकी बहीण योजनेवर (Mazi Ladki Bahin Yojana) सुरू असलेल्या या कायदेशीर प्रक्रियेचा निकाल काय लागणार आणि सरकार त्यावर काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
🔴 हेही वाचा 👉 छगन भुजबळ यांचे लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्ट मत, योजनेचे पैसे परत घेण्यात अर्थ नाही.